"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर । उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्याचे आर्थिक शक्तिपीठ समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा पेच अखेर सुटला असून, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक आणि सावरगावचे सुपुत्र संतोष दादा बोबडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमवारी (दि. २०) दुपारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत बोबडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
राजकीय गणिते आणि 'काटी' गटाचे वर्चस्व
तालुक्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काटी जिल्हा परिषद गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकतीच पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंह देशमुख यांची निवड झाली होती. त्यानंतर आता बाजार समितीचे सर्वोच्च पदही याच गटातील सावरगावच्या संतोष बोबडे यांना मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. बोबडे यांची निवड ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची मोठी खेळी मानली जात आहे.
निवडणूक प्रक्रिया आणि पक्षीय बलाबल
सोमवारी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. जगदाळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित जाधव यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. संतोष बोबडे यांच्या नावाचा प्रस्ताव संचालक विजय कंदले यांनी मांडला, तर त्याला संचालक ॲड. दिपक आलुरे यांनी अनुमोदन दिले. १८ सदस्य संख्या असलेल्या या समितीत भाजपचे संख्याबळ १५ वर पोहोचले असून, विरोधकांकडे केवळ ३ सदस्य उरले आहेत. सर्वच संचालकांनी बोबडे यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली.
जल्लोष आणि उपस्थिती
निवडीची घोषणा होताच बाजार समिती परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत परिसर भगवामय करून टाकला. यावेळी माजी सभापती आशिष सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून गेल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सभापती सिद्धेश्वर अण्णा कोरे, विक्रमसिंह देशमुख, तुळजापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रामचंद्र (आबा) रोचकरी, सुहास गायकवाड, सचिन कदम पाटील यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव उमेश भोपळे आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
"आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी काम करेन. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे आणि बाजार समितीचा विस्तार करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल. सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक कारभार करण्यावर माझा भर राहील."
--नवनिर्वाचित सभापती - संतोष (दादा) बोबडे
"संतोष दादा बोबडे यांच्यासारखा अभ्यासू आणि जनसंपर्क असलेला कार्यकर्ता सभापतीपदी विराजमान होणे ही बाजार समितीसाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
-- संचालक -ॲड. दिपक आलुरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर
तुळजापूर या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यातील भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, विशेषतः ग्रामीण भागात संतोष बोबडे यांच्या माध्यमातून पक्षविस्ताराला मोठी मदत होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
0 Comments