"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात आधुनिक शेती तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य आणि विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड यांनी शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बीजप्रक्रियेच्या योग्य पद्धती, हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड, खतांचा संतुलित वापर तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून जोखीम कमी करत उत्पन्न वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरून बियाण्यांसाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले. फळबाग लागवड, शेततळे व आधुनिक कृषी अवजारांसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती उपलब्ध होऊन नियोजनबद्ध शेतीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक कृषी अधिकारी अनिल पवार यांनी करत खरीप हंगामाच्या नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले.
या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ अलमले यांच्यासह सरडेवाडीतील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments