"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘आय एम विनर’ स्पर्धा परीक्षेत केंद्राच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमाताई माडजे व पंचायत समिती सदस्य श्री. कृष्णा (भैय्या) देवानंद रोचकरी या बहीण-भावांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत हा गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भैरवनाथ नारायण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सीमाताई माडजे, श्री. कृष्णा (भैय्या) रोचकरी, श्री. भैरवनाथ माडजे, केंद्रप्रमुख श्री. संजय वाले, ‘आय.एम. विनर’चे जिल्हा समन्वयक श्री. तुपारे, श्री. रामेश्वर तानवडे, वॉटरशेड समन्वयक श्री. शशिकांत सुरवसे, माजी मुख्याध्यापक श्री. राहुल थोडसरे, तसेच कोरेवाडीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नागनाथ वडणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. नागनाथ वडणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या भौतिक सुविधांसाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचाही प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. घोडके डी. टी. यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही भरारी शक्य झाल्याचे नमूद केले. मान्यवरांनी मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांच्या प्रयत्नांचेही विशेष अभिनंदन केले.
लहानशा गावातील या शाळेने गुणवंतांचा सन्मान करत मोठा आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रोचकरी बहीण-भावांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भुतेकर एस. आर. यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. घोडके डी. टी. यांनी केले. शेवटी उपस्थितांना नाश्ता व मठ्ठा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमासाठी कदमवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments