"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शेतीत अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार हनुमंत भानुदास गवळी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'पुण्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. रविवार, १२ एप्रिल रोजी धाराशिव येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
५ एकरातून ८५ एकरांपर्यंतचा थक्क करणारा प्रवास
हनुमंत गवळी यांची यशोगाथा कोणत्याही तरुणासाठी प्रेरणादायी आहे. वडिलोपार्जित केवळ ५ एकर शेती असताना त्यांनी २००१ मध्ये द्राक्ष बाग लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या कष्टाने आणि योग्य नियोजनाने त्यांनी आज ८५ एकर जमीन खरेदी केली असून, त्यापैकी ७० एकर क्षेत्रावर डोलणारी द्राक्ष बाग फुलवली आहे. या यशामध्ये त्यांचे बंधू श्रीमंत भानुदास गवळी यांचा मोलाचा वाटा असून, ही दोन भावांच्या एकत्रित कुटुंबाची आणि मेहनतीची यशोगाथा आहे.
युरोपच्या बाजारपेठेत वडगावच्या द्राक्षांचा डंका
गवळी यांनी केवळ शेतीच केली नाही, तर ती जागतिक दर्जाची केली. दरवर्षी त्यांच्या ७० एकर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्ष थेट युरोप खंडात निर्यात होतात. ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याने जागतिक बाजारपेठ काबीज करणे, ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब ठरली आहे.
मुलांच्या शिक्षणातून घडवली दुसरी पिढी
शेती सांभाळतानाच गवळी यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा अर्जुन (BSc Agri), कन्या वैभवी (BE Computer), मुलगा समर्थ आणि पुतणी श्वेता (MBBS) हे सर्वजण उच्च शिक्षण घेत असून, शेतीसोबतच शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
हनुमंत गवळी सध्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वडगाव (काटी) परिसरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Only न्यूज धाराशिव - आपल्या जिल्ह्याची आपली बातमी!
0 Comments