"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | विशेष प्रतिनिधी
तुळजापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे मोर्डा (ता. तुळजापूर) गावात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. "धरण उशाला अन् कोरड घशाला" अशीच काहीशी परिस्थिती मोर्डा ग्रामस्थांची झाली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच गावातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, प्रशासकीय अनास्थेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब मिळवण्यासाठी महिला, पुरुष आणि लहान मुलांना सकाळपासून रात्रीपर्यंत जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
विहिरीच्या काळजात उतरून पाण्याचा शोध!
गावातील आणि परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्त्रोत पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. गावातील एका खोल विहिरीच्या तळाशी जे काही थोडेफार गढूळ पाणी शिल्लक आहे, ते काढण्यासाठी महिलांना विहिरीच्या धोकादायक कडांवर उतरून, दोरीच्या साहाय्याने पाणी उपसावे लागत आहे. एखादा पाय घसरला तर मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही, केवळ तहान भागवण्यासाठी महिला आपला जीव मुठीत धरून पाणी भरत आहेत. हा थरार दररोज मोर्डा गावात पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायतीचा 'ढिम्म' कारभार; नागरिकांचा संताप उन्हाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी मोर्डा ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. गावात टँकर सुरू करण्याबाबत कमालीची उदासिनता दिसून येत असून, पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन अस्तित्वात नाही. ग्रामस्थांनी वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाचा कारभार ढिम्मच राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "कर आम्ही नियमित भरतो, मग पिण्याच्या पाण्यासाठी आमच्यावर ही वाईट वेळ का?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड, जनावरांचेही हाल
या पाणीटंचाईचा सर्वात मोठा फटका गावातील शाळकरी मुलांना बसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांना हातात हंडे आणि कॅन घेऊन पाण्यासाठी मैलोन्मैल भटकावे लागत आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही मुलांचा संपूर्ण वेळ पाण्यासाठी जात असल्याने त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. दुसरीकडे, पाशवी उन्हात मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने त्यांचेही अतोनात हाल होत असून, पशुपालक हवालदिल झाले आहेत.
आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. गावात नियमित शासकीय टँकर सुरू करावेत आणि गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी मोर्डावासियांनी केली आहे. प्रशासनाने जर पुढील दोन दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
0 Comments