'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांची अथांग श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका निष्ठावंत भाविकाने आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मातेला तब्बल ४९.४२० ग्रॅम वजनाचा देखणा सुवर्णहार अर्पण केला आहे. या सुवर्ण अर्पणाने भक्तीचा एक सुवर्णक्षण तुळजापूर नगरीत अनुभवयाला मिळाला.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे रहिवासी असलेले श्री. सचिन कालूराम येणभर हे आपल्या सहकुटुंबासह कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनापूर्वी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे हा मौल्यवान सुवर्णहार पूर्ण विधीवत आणि शासकीय सोपस्कार पार पाडत सुपूर्द केला. संस्थानच्या अधिकृत दप्तरी या सुवर्णहाराची रीतसर नोंद करण्यात आली आहे.
संस्थानकडून यथोचित सन्मान
भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या या दातृत्वाची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने श्री. येणभर आणि त्यांच्या कुटुंबाचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. माता भगवतीचा आशीर्वाद आणि प्रसाद देऊन संस्थानने त्यांचे आभार मानले.
या मंगलप्रसंगी मंदिर संस्थानचे वरिष्ठ अधिकारी, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, मंदीर कर्मचारी आणि मंदिराचे मानकरी-पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'आई राजा उदो-उदो'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
0 Comments