Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात मोकाट डुक्करांचा उच्छाद; पुजारी नगरला 'डुकरांचे ग्रहण';१०० ते १५० डुकरांचा धुमाकूळ; रोगराईच्या छायेत नागरिक, नगरपरिषद प्रशासनाचे 'लक्ष देण्याची' गरज!

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तुळजापूर शहरात सध्या पाळीव व मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील 'पुजारी नगर' परिसराला डुकरांचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात तब्बल १०० ते १५० डुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, येथील स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. येथील नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य पुरते धोक्यात आले असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कडब्याचे नुकसान, पायाभूत सुविधांची नासधूस
पुजारी नगर भागातील दोन- तीन शेतकरी व दूध उत्पादक नागरिकांनी घराशेजारी गाई-म्हशी पाळल्या आहेत. मात्र, या डुकरांच्या कळपाने जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या महागड्या कडब्याची आणि चाऱ्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर, रस्त्याच्या कडेला आणि घरांसमोर डुकरांनी जागोजागी मोठमोठे खड्डे खणून ठेवल्याने रस्ते खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन उकरल्या आहेत. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लहान मुले व ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण
परिसरात डुकरांचे कळपच्या कळप ठाण मांडून बसत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. सकाळ-संध्याकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांना या डुकरांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. अनेकदा हे प्राणी नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

⚠️ आरोग्याचा गंभीर धोका: डॉक्टरांचा इशारा
परिसरात जागोजागी डुकरांनी चिखल आणि विष्ठा केल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. डास, माश्या आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मोकाट डुकरांच्या अशा वावरामुळे स्वाईन फ्लू (H1N1), लेप्टोस्पायरोसिस, आणि मेंदूज्वरासारख्या जीवघेण्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. आधीच पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने न बघितल्यास येथे साथीच्या आजारांचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपरिषद ह्या समस्येकडे लक्ष देईल का; नागरिकांचे लक्ष 
या गंभीर समस्येबाबत पुजारी नगरमधील त्रस्त रहिवाशांनी तुळजापूर नगरपरिषदेकडे  तोंडी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, नगरपरिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष्य देऊन या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करून संबंधित मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी न केल्यास, संपूर्ण नगरपरिषदेवर 'उग्र ठिय्या आंदोलन' करण्याचा इशारा पुजारी नगरमधील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments