Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

देवी तुळजाभवानीच्या दर्शनाने लोककल्याणासाठी काम करण्याची नवी ऊर्जा; केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन! धार्मिक दौऱ्याला सामाजिक बांधिलकीची जोड! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते तुळजापुरात १०० महिलांचा सन्मान

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड
"छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार आशीर्वादरुपी देणारी ही आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी उभ्या देशाचे मुख्य प्रेरणास्थान आहे. देवीच्या दर्शनाने मिळणारी अलौकिक आणि सात्विक ऊर्जा निश्चितच देशातील गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या कल्याणकारी कामकाजाला मोठी ताकद व पाठबळ देणारी ठरेल," अशा उत्स्फूर्त भावना केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद (भाऊ) नाईक यांनी व्यक्त केल्या. शनिवार, दिनांक १८ जुलै रोजी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ते तुळजापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी व कार्यकर्त्यांशी बोलत होते.

फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे दुपारी तुळजापूर शहरात आगमन होताच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीने आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर मंत्री महोदयांनी पारंपारिक विधीवत पद्धतीने गाभाऱ्यात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले व महाआरती केली. "तुळजापूरकरांनी केलेले हे स्वागत आणि दाखवलेले प्रेम मनाला मनस्वी आनंद देणारे असून देवीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले आहे," असेही मंत्री महोदयांनी आवर्जून नमूद केले.

धार्मिक दौऱ्याला सामाजिक सेवेची जोड: १०० महिलांना साडी वाटप
दर्शन सोहळा संपन्न झाल्यानंतर, या धार्मिक दौऱ्याचे औचित्य साधून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद भाऊ व्यवहारे यांच्या वतीने परिसरातील १०० गरीब व गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या सर्व महिलांना सन्मानपूर्वक साड्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब कुटुंबातील महिलांना मिळालेल्या या आधारामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. राजकीय दौऱ्यांमध्ये केवळ घोषणाबाजी न करता अशी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले पाहिजेत, असा सुर या निमित्ताने उमटला. यावेळी व्यवहारे कुटुंबियांच्या वतीने मंत्री नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि राजकीय वर्तुळात चर्चा
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर साहेब, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य, आणि काटी येथील तुळजापूर शुगर कारखान्याचे चेअरमन ॲड. अनिल काळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे आगामी काळातील ऊर्जा क्षेत्रातील विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांना गती मिळण्याची चर्चाही या निमित्ताने रंगली होती.

हे प्रमुख मान्यवर होते उपस्थित:
कार्यक्रमाला माजी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, मंडल अध्यक्ष आनंद कंदले, आयोजक गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, सागर पारडे, विकास मलबा, साहेबराव घुगे यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments