तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सध्या जीर्णोद्धार आणि विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर संस्थानाने विशेष नियोजन केले आहे. मात्र, या कामांमुळे आणि आषाढी वारीच्या निमित्ताने वाढलेल्या गर्दीमुळे दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याने भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंदिर परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने, आवश्यकतेनुसार धर्मदर्शन रांग, मुखदर्शन रांग किंवा ३०० रुपयांच्या देणगी दर्शन रांगा काही कालावधीसाठी तात्पुरत्या थांबवल्या जाऊ शकतात. गर्दी कमी झाल्यानंतर संबंधित दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाविकांच्या मदतीसाठी 'May I Help You' पथक
मंदिर परिसरात वाढणारी गर्दी लक्षात घेता, भाविकांच्या सुविधेसाठी 'May I Help You' पथक कार्यरत करण्यात आले आहे. हे पथक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच हरवलेल्या भाविकांना दर्शन मार्गदर्शन, आवश्यक सुविधांची माहिती आणि तातडीची मदत पुरवत आहे. याशिवाय, दर्शन मंडपाच्या प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानाकडून करण्यात आले आहे.
0 Comments