Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"जिथे अवतरली साक्षात पंढरी; तेच आपले धामणगाव श्रीक्षेत्री!"; "नागझरीच्या तीरावर रंगला वैष्णवांचा मेळा; धाकटी पंढरीत फुलला आषाढीचा सोहळा!" 'ज्ञानोबा-तुकाराम' अन् विठूनामाचा गजर... 'धाकटी पंढरी' धामणगावात आषाढीला भक्तीचा मोगरा फुलला!बार्शीच्या बालेघाटात पंचक्रोशीतील वैष्णवांचा मेळा; संत माणकोजी बोधले महाराजांच्या पावनभूमीत भक्तांची मांदियाळी


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
 बालेघाटाच्या कुशीत अन् नागझरी नदीच्या निसर्गरम्य तीरावर वसलेले, संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या हस्तस्पर्शाने आणि संत माणकोजी बोधले महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले 'धाकटी पंढरी' म्हणजेच धामणगाव (ता. बार्शी) आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्णतः भक्तीरसात न्हाऊन निघाले आहे. टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका अन् 'विठ्ठल-विठ्ठल'चा नामघोष करत तुळजापूर, काटी, सावरगाव, दहिवडी, सुरतगाव, जवळगाव आदी पंचक्रोशीतील हजारो वारकरी पायी दिंड्यांसह धामणगावात दाखल झाले असून, येथे भक्तीचा अभूतपूर्व सोहळा रंगला आहे.

साक्षात पंढरीचाच आभास!
वारकरी संप्रदायात धामणगावला 'प्रति पंढरपूर' किंवा 'छोटी पंढरी' म्हणून विशेष स्थान आहे. आषाढी-कार्तिकीला साक्षात पांडुरंग धामणगावात अवतरतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. तुळजापूर तालुक्यातील काटीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या या क्षेत्री शनिवारी (दि. २५ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त जनसागर लोटला होता. मंदिरात पार पडणारे भजन, कीर्तन, जोगवा आणि महिलांची फुगडी यामुळे संपूर्ण परिसर हरिनाम गजर अन् भक्तीमय चैतन्याने दुमदुमून गेला. आषाढी एकादशीपासून सुरू झालेला हा यात्रा उत्सव आगामी पौर्णिमेपर्यंत अखंड चालणार आहे.

"धामणगावच्या या ऐतिहासिक अन् पवित्र मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्याचे अद्वितीय समाधान लाभते."
          — गणेश पुजारी, अध्यक्ष - पुजारी नगर फाउंडेशन, तुळजापूर.

"पंढरपूरची वारी म्हणजे आमचा आत्मा; पण कामाच्या व्यापामुळे किंवा वयोमानामुळे ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी धामणगावचे हे धाम प्रत्यक्ष 'साक्षात पंढरी'च आहे. संत माणकोजी बोधले महाराजांच्या या पावन भूमीत पाऊल ठेवताच पांडुरंगाच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मन तृप्त होते."
— श्रावण मामा पवार (कार्याध्यक्ष पुजारी नगर फाउंडेशन, तुळजापूर)

"टाळ-मृदंगाच्या गजरात हातात भगवी पताका घेऊन जेव्हा आम्ही भाविक धामणगावच्या दिशेने पायी निघतो, तेव्हा प्रवासाचा ताण कुठल्या कुठे पळून जातो. संत तुकोबारायांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या या विठूरायाच्या दर्शनाने मिळणारी ऊर्जा आणि शांती शब्दातीत आहे."
             — हभप  सुनिल ढगे महाराज (काटी)

संत माणकोजी बोधले मंदिराचे वंशज 
"संत माणकोजी बोधले महाराजांनी दुष्काळात अन् संकटातही भक्तीचा आणि परोपकाराचा मार्ग दाखवला. आषाढीच्या या पावन पर्वावर दरवर्षी पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांची सेवा करणे हाच आमचा खरा परमार्थ आहे. ‘देव पंढरीहून धामणगावी येतात’ ही भाविकांची श्रद्धाच या तीर्थक्षेत्राचे चैतन्य टिकवून आहे."
— हभप विवेकानंद महाराज बोधले वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी / सेवाभावी कार्यकर्ते, धामणगाव

संत तुकोबारायांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा लाभलेले पावनस्थान
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूरची वारी चुक नये म्हणून शेतातील उभी पिके व खळे सोडून पंढरीस धावणाऱ्या माणकोजी महाराजांच्या भक्तीला भुलून खुद्द पांडुरंगाने त्यांच्या शेताची राखण केली होती, अशी ऐतिहासिक आणि श्रद्धावनत आख्यायिका आहे. माणकोजी बोधले महाराज हे प्रत्यक्ष निवृत्तीनाथांचे अवतार मानले जातात. संत तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी या महासंतांच्या समकालीन असलेल्या माणकोजी महाराजांनी स्थापन केलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खुद्द जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शुभहस्ते झाली आहे. महाराजांच्या अभंगांचे लिखाण प्रत्यक्ष पांडुरंगाने केले असून सध्या त्यांचे ११ वे वंशज श्री विवेकानंद बोधले महाराज ही सेवापरंपरा निष्ठेने पुढे चालवत आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सामाजिक भान
इ.स. १६०४ ते १६९४ या काळात मूळचे जगताप घराण्यातील क्षत्रिय असलेले माणकोजी महाराज पंढरीच्या दर्शनाने पूर्णतः विठ्ठलमय झाले. त्यांनी दुष्काळाच्या काळात स्वतःच्या धान्याची पेवे जनसामान्यांसाठी खुली केली होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 'बोधलेबुवांची ओवरी', पिण्याच्या पाण्याचा दगडी रांजण आणि इ.स. १६४० मध्ये विष्णुपदावर बांधलेला दगडी पार ही त्यांची वारकरी संप्रदायाला लाभलेली ऐतिहासिक देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांनीही ज्यांना गुरूस्थानी मानले, अशा या सत्पुरुषाच्या भूमीत आजचा आषाढी सोहळा ऐतिहासिक उत्साहात पार पडत आहे.

सामाजिक बांधिलकी अन् चोख व्यवस्था
आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर धामणगावकडे जाणाऱ्या हजारो पायी वारकऱ्यांसाठी खुंटेवाडी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते  उद्योजक  M.V. Tech Engg (विराज ट्रेलर, वैराग) तर्फे आषाढी वारीच्या बाविकांना फराळ वाटप आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकरी बाविकांच्या सेवेसाठी M.V. Tech Engg, विराज ट्रेलर, वैराग यांच्या वतीने फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या सेवेत शाबू, केळी, चहा आणि पाणी वाटप करून वारीतील बाविकांची तहान-भूक भागविण्यात आली. 

या समाजसेवेत या मान्यवरांनी घेतला सहभाग   
मोहन जाधव, बळी भगवान जाधव, भैरीनाथ कदम, विश्वास जाधव, रामहरी आचार, बाळासाहेब जाधव, कालिदास जाधव, पिंटू जाधव, सत्यवान कदम, बालाजी जाधव, किसान आचार, कुलदीप जाधव, ओमराजे भोसले, संपत सर, सुरेश आचार सर, Avd मयूर आचार, तानाजी जाधव, संभाजी जाधव, मयूर जाधव, राजाभाऊ जाधव, अप्पा जाधव, Avd हनुमंत जाधव मुंबई, बापू पवार, बाळू पवार यांच्या मोलाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

M.V. Tech Engg च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या या सेवेबद्दल वारकरी संप्रदायातून कौतुक होत आहे.

 गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनासह गावातील तरुण कार्यकर्त्यांचा फौजफाटा सज्ज होता.

Post a Comment

0 Comments