तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
वाढदिवसाचा आनंद केवळ झगमगाट आणि खर्चिक पार्ट्यांपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा नवा पायंडा तुळजापूर येथील राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबचे सदस्य अमर गायकवाड यांनी पाडला आहे. आपली मुलगी आनंदी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी नळदुर्ग येथील ‘चैतन्य मूकबधिर शाळे’तील ५० गरजू विद्यार्थ्यांना नवीन कपडे (ड्रेस) व बूट वाटप केले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या नवीन कपड्यांमुळे आणि बुटांमुळे मूकबधिर बालकांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद फुलला होता.
मुलीचा वाढदिवस २४ ऑगस्ट रोजी असला, तरी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विपीन शिंदे होते. तर सचिन शिंदे, नितीन सूर्यवंशी, प्रमोद गायकवाड, अक्षय दुपारगुडे यांच्यासह चैतन्य मूकबधिर शाळेचे शिक्षक अंबादास कोळेकर, बाळू ढोबळे, गणेश मामाने व तनुजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकीची अनोखी भेट
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक अंबादास कोळेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले, “समाजातील वंचित आणि गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेतला तरच वाढदिवसाला खरा अर्थ प्राप्त होतो.” या वेळी सचिन शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून बूट उपलब्ध करून देत चिमुकल्या आनंदीला वाढदिवसाचे एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण ‘गिफ्ट’ दिले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
संस्कार अन् माणुसकीची रुजवणूक
आपल्या भावना व्यक्त करताना अमर गायकवाड म्हणाले, “मुलांच्या आनंदाचे प्रसंग केवळ वैयक्तिक कौतुकापुरते न ठेवता त्यातून सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे लहान वयातच मुलांवर समता, आपुलकी आणि माणुसकीचे संस्कार रुजण्यास मदत होते.”
समाजातील प्रत्येक घटकाने आपापले आनंदाचे क्षण अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करून समाजात आपुलकीचे वातावरण निर्माण करावे, असा सुरेख संदेश या वेळी देण्यात आला. राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब तसेच चैतन्य मूकबधिर शाळेच्या वतीने अमर गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक व आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप नितीन सूर्यवंशी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. उपस्थितांनी आनंदीला तिच्या भावी आयुष्यासाठी आणि वाढदिवसासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
0 Comments