Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीच्या चिमुकल्यांनी जवानांशी जोडले रक्षाबंधनाचे कृतज्ञतेचे नाते; स्वनिर्मित राख्या व भावस्पर्शी शुभेच्छापत्रांसह खासदार, आमदारांनाही पाठवला आपुलकीचा संदेश

काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 क्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तामलवाडी येथे अनोखा आणि भावस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या विविधरंगी राख्या तसेच जवानांच्या शौर्य, त्याग व देशभक्तीला सलाम करणारी भावस्पर्शी शुभेच्छापत्रे राख्यांसोबत जवानांना पाठविण्यात आली.

शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती ज्ञानेश्वरी आनंदराव शिंदे यांनी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. देशसेवेचे व्रत स्वीकारून कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर तामलवाडीतील चिमुकल्या बहिणींच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा धागा पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक जवानाला बहिणीच्या प्रेमाची आणि मायेची अनुभूती मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आकर्षक रंगांच्या राख्या स्वतः तयार केल्या. प्रत्येक राखीसोबत सैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन करणारे शुभेच्छापत्र तयार करण्यात आले. “सीमेवर उभा असलेला जवान हा देशाचा खरा रक्षक आहे. ऊन, वारा, पाऊस, बर्फ आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता तो देशाचे रक्षण करतो; म्हणूनच आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे आमदार तसेच विविध मान्यवरांनाही स्वनिर्मित राख्या आणि शुभेच्छापत्रे पाठवून रक्षाबंधनाच्या माध्यमातून आपुलकीचा संदेश दिला.

“राखीचा धागा छोटासा; मात्र भावना देशरक्षणासाठी तत्पर असलेल्या जवानांसाठी विशाल!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, सैनिकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना रुजविण्यात आली. त्याचबरोबर राखी निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला आणि कार्यकौशल्याला वाव मिळाला. भारतीय संस्कृतीतील रक्षाबंधनाची परंपरा जपत विद्यार्थ्यांना सामाजिकतेचे, संवेदनशीलतेचे आणि देशभक्तीचे धडे देणारा हा उपक्रम चिमुकल्यांसाठी आनंददायी अनुभूती देणारा ठरला.

या उपक्रमास मुख्याध्यापक राजाराम वाघमारे, शिक्षक विठ्ठल नरवडे, राजकुमार घोडके, उमेश सुर्वे, ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे, नवल धाकवाडे, स्मिता पाटोळे, जयश्री राऊत यांची उपस्थिती होती. तामलवाडीच्या विद्यार्थ्यांनी राखीच्या माध्यमातून सीमेवरील जवानांशी जोडलेले हे भावनिक नाते आणि त्यांच्या शौर्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

Post a Comment

0 Comments