'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
श्रीक्षेत्र तुळजापूर येथून श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान, पंढरपूरसाठी तुळजापूर आगाराची नवीन थेट बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि. २४) रोजी एकदिवसीय प्रायोगिक फेरी घेण्यात येत आहे. वाघमारे गहिनीनाथ महाराज पालखी मार्गावरून धावणारी ही बस सकाळी साधारण ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान शेळगाव येथे पोहोचणार आहे. जाणे-येणे अशा दोन्ही फेऱ्यांची सोय असलेल्या या सेवेचे भाविक व वारकऱ्यांकडून स्वागत होत असतानाच, अवघ्या एका किलोमीटरच्या रस्त्याअभावी वाणेवाडीकरांना मात्र या सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
श्री. निलेश लक्ष्मण गायकवाड यांच्या विशेष पुढाकारातून ही बससेवा सुरू होत असल्याने परिसरातील भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मात्र, ग्रुप ग्रामपंचायत वाणेवाडी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वारकऱ्यांसमोर रस्त्याचा प्रश्न अद्याप कायम आहे.
एका किलोमीटरसाठी दहा किलोमीटरचा वळसा
वाणेवाडी ते सावंतवाडी क्र. २ दरम्यानच्या ओढ्यावर अद्याप पक्का पूल अथवा सिमेंट मोरी नसल्याने बस वाणेवाडी गावात थेट पोहोचू शकत नाही. परिणामी, अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना तब्बल दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यामुळे अतिरिक्त प्रवासखर्च, वेळेचा अपव्यय आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक व वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दयानंद बादगुडे यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा
ही बसफेरी सुरू व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद भगवान बादगुडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर एसटी प्रशासनाने मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली असता ओढ्यावरील पुलाअभावी तांत्रिक अडचण समोर आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पूल बांधा किंवा पर्यायी मार्ग द्या
गावाजवळून थेट बस जात असतानाही केवळ एका किलोमीटरच्या रस्त्याअभावी वाणेवाडीकरांना या सुविधेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे ओढ्यावर तातडीने पूल अथवा सिमेंट मोरी बांधावी किंवा तोपर्यंत वाणेवाडीकरांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, भविष्यात या मार्गावरील सर्व रस्ते व पूल कामे पूर्ण करून वाघमारे गहिनीनाथ महाराज पालखी मार्गाच्या धर्तीवर ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या माघ वारी पालखी मार्गाने तुळजापूर-पंढरपूर जाणे-येणे बससेवा कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी वारकरी, भाविक आणि नागरिकांतून होत आहे.
“बससेवा गावापर्यंत आली, पण रस्त्याअभावी गाव मात्र दूरच!” अशी वाणेवाडीकरांची व्यथा असून, प्रशासन आता या प्रश्नावर किती गांभीर्याने पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
0 Comments