धाराशिव – Only न्युज धाराशिव
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सांजा येथे शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “चमत्कार सादरीकरण सह अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर आयोजित या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची ज्योत प्रज्वलित केली.
कार्यक्रमाची सुरुवात “बोला आज मिळून सारे” या विज्ञान गीताने उत्साहात झाली. यानंतर मंत्राने आरती पेटवणे, तीर्थ देणारा तांब्या, मोडलेली काडी मंत्राने जोडणे, प्रश्नचिन्ह बोटाच्या टोकावर स्थिर ठेवणे, तांब्यात भूत बंद करणे, मंत्राने दिवा पेटवणे अशा विविध ‘चमत्कारां’चे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.विशेष म्हणजे, काही प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेत त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून सांगण्यात आली. “आपण विज्ञानाची सृष्टी घेतली; पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही, म्हणूनच अंधश्रद्धेला बळी पडतो,” असा प्रभावी संदेश देत विद्यार्थ्यांना जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक रणजीत कदम सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्यामसुंदर तनमोर सर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजीत कदम सर, श्यामसुंदर तनमोर सर, सूर्यवंशी सर तसेच महिला शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकासाठी वार्षिक वर्गणीदार नोंदणी करण्यात आली. उपस्थित शिक्षकांपैकी पाच जणांनी मासिकासाठी नोंदणी केल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विज्ञाननिष्ठ विचारांचा जागर विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
0 Comments