"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुंबई: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित आर.आर. पाटील यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेत मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मतदारसंघातील वाढते अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) जाळे, जुगार आणि अवैध धंद्यांविरोधात त्यांनी थेट विधानसभेत आवाज उठवत प्रशासनाला धारेवर धरले.
तरुणाई बरबाद होऊ देणार नाही!
विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होताना रोहित पाटील यांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, "तासगाव आणि कवठेमहांकाळ परिसरात सध्या अंमली पदार्थांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे आमची तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. दुसरीकडे जुगार आणि इतर अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे."
पोलिस प्रशासनाला थेट इशारा
आमदार पाटील यांनी केवळ प्रश्नच मांडले नाहीत, तर या अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. "गुन्हेगारांना कोणाचं पाठबळ आहे?" असा सवाल उपस्थित करत, त्यांनी तातडीने यावर आळा न बसल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दिवंगत लोकनेते आर.आर. (आबा) पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"आबांच्या मतदारसंघात हे काय चाललंय?" – आमदार रोहित पाटलांचा उद्विग्न सवाल
आमदार रोहित पाटील यांनी अत्यंत भावूक पण तितक्याच कडक शब्दांत सरकारला सुनावले. ते म्हणाले की, "स्व. आर.आर. (आबा) पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली होती. त्यांनी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्याच तासगाव- कवठेमहांकाळ मध्ये आज अंमली पदार्थ आणि जुगाराचे पेव फुटले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या आबांनी राज्याला शिस्त लावली, त्यांच्याच मतदारसंघात असे प्रकार चालणार असतील, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही.माझ्या मतदारसंघातील सामान्य माणूस आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. अवैध धंद्यांविरुद्धची ही लढाई आता थांबणार नाही."
— आमदार रोहित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष)
ब्युरो रिपोर्ट: Only न्युज धाराशिव
0 Comments