Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

📰जागतिक आरोग्य दिनानिमित्त नळदुर्गमध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप; नगराध्यक्षांचा सामाजिक उपक्रम

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
नळदुर्ग | प्रतिनिधी
जागतिक आरोग्य दिनानिमित्त (दि. 7 एप्रिल) उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे दि. 8 एप्रिल 2026 रोजी एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. माननीय नगराध्यक्ष श्री. बसवराजआप्पा धरणे यांच्या हस्ते क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंचल बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या 2026 च्या जागतिक आरोग्य दिनाच्या घोषवाक्याला साजेसा उपक्रम पार पडला. नगराध्यक्षांनी सहा फूड बास्केटचे वाटप करून क्षयरुग्णांना आधार दिला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत मागील दोन वर्षांपासून पोषण आहार वाटपाचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बनसोडे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवला जात असून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजू रुग्णांना मदत केली जाते.

या आवाहनाला प्रतिसाद देत नगराध्यक्ष बसवराजआप्पा धरणे यांनी सहा फूड बास्केट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. मागील वर्षी देखील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ फूड बास्केटचे वाटप केले होते, अशी आठवण यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंचल बोडके व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र मडके यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रतिनिधी श्री. शरदकुमार बोने यांनी उपस्थित नगरसेवकांना तुळजापूर तालुक्यातील गरजू क्षयरुग्णांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

“होय! आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो – भारताच्या नेतृत्वाखाली, जनभागीदारीच्या बळावर” हा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास नगरसेवक तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, अनिल राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, पद्माकर घोडके तसेच डॉ. सुरेंद्र मडके, डॉ. भोरे, तालुका क्षयरोग पथक पर्यवेक्षक महेश पाठक, देविदास जाधव आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments