"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ (यमगरवाडी) येथील एकलव्य विद्या संकुल येथे इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थिनी, महिला कर्मचारी आणि परिसरातील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभरहून अधिक जणींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. दत्तात्रय खुणे, सचिव डॉ. नितीन भोसले, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. प्रसाद धर्म, डॉ. अभय शहापूरकर आणि डॉ. वहिदा शेख उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
स्वच्छता आणि अभ्यासाचा जवळचा संबंध
धाराशिव येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रसाद धर्म यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी जर आपली वैयक्तिक स्वच्छता नीट ठेवली, तर आरोग्य उत्तम राहते आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम अभ्यासावर व एकाग्रतेवर होतो."
डॉ. धर्म हे दर बुधवारी विद्या संकुलातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करतात, त्यांनी आपले अनुभवही यावेळी मुलांशी शेअर केले.
गुणवंतांचा सत्कार
तपासणी दरम्यान ज्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण उत्तम आढळले, अशा वैष्णवी पुजारी या विद्यार्थिनीचा आणि टेक्निशियन करे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी यमगरवाडीच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या प्रवासाची माहिती दिली.
शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडा: डॉ. दत्तात्रय खुणे
अध्यक्षीय भाषणात डॉ. दत्तात्रय खुणे यांनी यमगरवाडीत मिळणाऱ्या सुविधांचे कौतुक केले. ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या विविध भागातून येथे मुले शिक्षणासाठी येतात, ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन मोठे व्हावे आणि भविष्यात आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी योगदान द्यावे."
उपस्थित मान्यवर
यावेळी ऐश्वर्या जाधव व प्रियंका गायकवाड या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता शेटकार यांनी केले तर आभार निर्मला हुग्गे यांनी मानले.
या प्रसंगी मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वहिदा शेख, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे,अण्णासाहेब कोल्हटकर, अनिल घुगे,अशोक बनकर, संतोष बनसोडे, श्रीमती गडदे, श्रीमती गुरव, श्रीमती लोहार यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments