"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कसई (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त इयत्ता पहिलीतील नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या प्रवेशोत्सवात एकूण २५ चिमुकल्यांचे आनंददायी वातावरणात शाळेत स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. स्वागत फलक, रंगीबेरंगी रांगोळी, मनमोहक सेल्फी पॉईंट, सुमधुर संगीत तसेच ढोल-ताशांचा गजर यामुळे वातावरण उत्साहाने भारून गेले होते.
यावेळी गावचे सरपंच बोधला गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेंद्र सुरवसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंडलिक भोवाळ, मुख्याध्यापक भारत मुंढे तसेच पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पहार घालून, वाढदिवसाची टोपी, चॉकलेट, फुगे व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. माता-पालकांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे पावलांचे कुंकवातील ठसे कागदावर उमटवले.
यानंतर संपूर्ण गावातून ट्रॅक्टरमधून ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम सादरीकरणासह विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या प्रवेशोत्सवासाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले असून ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहकार्य केले.
0 Comments