"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव: उमाजी गायकवाड
धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण येत्या रविवारी अनुभवता येणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे हे रविवारी (दि. १२) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दैनिक 'पुण्य नगरी' आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचा भव्य बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या महासोहळ्यासाठी संपूर्ण धाराशिव नगरी सज्ज झाली असून जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा 'मिनिट टू मिनिट' कार्यक्रम जाहीर
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत दौऱ्यानुसार, ना. एकनाथ शिंदे यांचे रविवारी सकाळी ११:१५ वाजता धाराशिव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ११:३० वाजता ते नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित मुख्य सोहळ्याला उपस्थित राहतील. या ठिकाणी 'पुण्य नगरी'च्या २.५१ कोटींच्या कुपन योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांना 'पुण्य पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येईल.
गावोगावी झळकले स्वागताचे बॅनर; शिवसैनिकांसह नागरिकांमध्ये उत्साह
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जिल्हाभर प्रत्येक तालुक्यात आणि गावोगावी भव्य बॅनर आणि होर्डिंग्स झळकले आहेत. धाराशिव शहरासह तुळजापूर, नळदुर्ग उमरगा, कळंब, भूम, वाशी आणि लोहारा तालुक्यात ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री महोदयांच्या आगमनानिमित्त आणि महासोहळ्याच्या शुभेच्छांचे बॅनर लावून शहर भगवेमय करण्यात आले आहे.
राजकीय दिग्गजांची मांदियाळी आणि पुरस्कारांचा वर्षाव
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक भूषवणार असून, व्यासपीठावर मंत्री भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, 'मित्रा'चे CEO प्रविणसिंह परदेशी, आ. डॉ. तानाजीराव सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आवाहन
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणाऱ्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही यावेळी होणार आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Only न्यूज धाराशिव - आपल्या जिल्ह्याची आपली बातमी!
0 Comments