"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
अभावातही स्वभाव न बदलता कष्टाची कास धरली की यश कसं पायाशी लोळण घेतं, याचंच मूर्तिमंत उदाहरण बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील वैष्णवी मोहन बाडगुडे हिने घालून दिलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैष्णवीने ९४.२० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागासह जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. मात्र, तिचे हे यश केवळ शैक्षणिक नसून व्यवस्थेच्या नाकर्तेपणावर ओढलेले ताशेरे ठरले आहेत.
२ किलोमीटरची जीवघेणी पायपीट
वैष्णवीचे वडील मोहन बाडगुडे यांची शेती शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी (ता. तुळजापूर) शिवारात आहे. शेळगाव आणि वाणेवाडी ही दोन्ही गावे सोलापूर-धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने भौगोलिक अडचणींचा डोंगर मोठा आहे. घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी साधा पक्का रस्ताही उपलब्ध नाही. पावसाळ्यात गुडघाभर चिखल तुडवत आणि उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात वैष्णवीला दररोज साधारण २ किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली. ही केवळ पायपीट नव्हती, तर तिच्या स्वप्नांचा पाठलाग होता.
अंधारालाही जिद्दीने दिली मात
शेतात वास्तव्यास असताना वीज आणि मूलभूत सोयीसुविधांची मोठी वानवा होती. मात्र, निसर्गाच्या आव्हानांना तिने कधीही जुमानले नाही. दिवसा आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करून रात्रीच्या वेळी जेव्हा गाव शांत व्हायचे, तेव्हा वैष्णवी सौर कंदील आणि बॅटरीच्या मंद उजेडात तासन् तास अभ्यास करायची. तिच्या डोळ्यांतील जिद्दीने त्या अंधारालाही फिके पाडले आणि शेवटी ९४.२० टक्क्यांची दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली.
प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि 'तिचा' टाहो
वैष्णवीचे हे यश कौतुकास्पद असले तरी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही एका गुणवंत विद्यार्थिनीला चिखलातून पायपीट करावी लागते, ही प्रशासनासाठी शरमेची बाब मानली जात आहे. 'रस्ता नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही' असा संदेश तिने आपल्या कार्यातून दिला आहे. आता तरी प्रशासन जागं होऊन शेळगाव ते वाणेवाडी या शिवारातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
"परिस्थिती गरीब असली तरी स्वप्नं मोठी होती. चिखलाचा रस्ता आणि अंधार मला कधीच अडवू शकला नाही, कारण आई-वडिलांचे कष्ट मी जवळून पाहिले आहेत."
- वैष्णवी बाडगुडे, गुणवंत विद्यार्थिनी
आमच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी 'Only न्युज धाराशिव'ला फॉलो करा.
0 Comments