"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर धाराशिव जिल्ह्याचा झेंडा मुंबईत पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र इंजि. यशपाल अभिमान हंगरगेकर यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) ‘कार्यकारी अभियंता (स्थापत्य) वर्ग-१’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे. या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचे बालमित्र आणि आमदार कैलास पाटील यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या या यशाचा गौरव केला आहे.
शैक्षणिक प्रवास आणि संघर्षातून यश
यशपाल हंगरगेकर यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. शिंदे हायस्कूल (तुळजापूर), छत्रपती शिवाजी हायस्कूल (धाराशिव) आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथून त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तांत्रिक शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन व तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय (तुळजापूर) येथून बी.ई. पदवी संपादन केली. त्यानंतर नांदेड येथील प्रख्यात एसजीजीएस (SGGS) संस्थेतून एम.टेक. पूर्ण करून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले. २०११ मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेत 'सब इंजिनिअर' म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता आणि आता थेट कार्यकारी अभियंता पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
धाराशिवमध्ये यथोचित सत्कार
पदभार स्वीकारल्यानंतर धाराशिव येथे आगमन होताच त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. ९ मे रोजी शिक्षक मित्र परिवारातर्फे, तर १० मे रोजी सकाळी तुळजाभवानी ज्येष्ठ नागरिक संघाकडून त्यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. काकासाहेब आहेर, मा. शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव, प्रा. डॉ. देविदास इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यशपाल यांच्या कामाच्या तळमळीचे कौतुक केले.
आमदार कैलास पाटील यांच्याकडून गौरव
यशपाल यांचे बालमित्र तथा कळंब-धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या यशावर आनंद व्यक्त करताना म्हटले की, "सततची मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशपालने मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. सामान्य नागरिकांच्या विकासाशी निगडित असलेल्या या पदावरून त्याच्या हातून अधिक दर्जेदार काम होईल, याची खात्री आहे."
या कार्यक्रमाला प्राचार्य जी. के. सोन्नेपाटील, विजयकुमार बागल, दिलीप पवार, तानाजी सिनगारे, गोरोबा लोंढे, अशोक चव्हाण, सतीश पवार, दादासाहेब हंगरकर, दयानंद जवळगावकर, अनिल हंगरकर, बापू काळे, सतीश महामुनी, संतोष भालेकर, तुकाराम वडणे, सुनील फंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई सारख्या महानगरपालिकेच्या विकास प्रक्रियेत काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य
"प्रशासकीय सेवेत काम करताना कामाप्रती निष्ठा आणि सातत्य असेल, तर यश नक्कीच मिळते. मुंबईसारख्या महानगराच्या विकास प्रक्रियेत आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत कार्यकारी अभियंता म्हणून योगदान देण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या या यशात आई-वडील, गुरुजन आणि मित्रांचे मोठे योगदान आहे. जनसेवेचा हा वारसा असाच समर्थपणे पुढे नेण्याचा माझा मानस आहे."
इंजि. यशपाल अभिमान हंगरगेकर (कार्यकारी अभियंता, BMC)
मुलगा यशपालचा आम्हा आईवडिलांना सार्थ अभिमान
"एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण दुसरा असूच शकत नाही. ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या कष्टाने आणि बुद्धिमत्तेने यशपालने जे स्थान निर्माण केले, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याने समाजाचे ऋण ओळखून आपल्या पदाचा वापर दीन-दलितांच्या आणि सामान्यांच्या कल्याणासाठी करावा, हीच सदिच्छा."
--प्रा.अभिमान हंगरगेकर (यशपाल यांचे वडील)
0 Comments