Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

क्रिकेटच्या गर्दीत ऑलिम्पिक खेळांना सन्मान मिळवून देण्याची गरज; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादनव्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी जयदेव म्हमाणे यांची 'एकमेव भारतीय पंच' म्हणून निवड; मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
"शारीरिक ताकद लढाई जिंकते, पण मानसिक दृढता विजयाला अजरामर करते," हाच मूलमंत्र जपत धाराशिवच्या सुपुत्राने क्रीडा जगतात भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. मराठवाड्यातील धाराशिव  जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) सारख्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या जयदेव घनश्याम म्हमाने यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) च्या मान्यतेने व्हिएतनाम येथे होणाऱ्या आगामी 'UWW आशियाई पॅनक्रेशन आणि हौशी MMA चॅम्पियनशिप २०२६' साठी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. या अत्यंत मानाच्या स्पर्धेसाठी जगभरातून निवडण्यात आलेल्या अवघ्या १६ पंचांमध्ये जयदेव म्हमाने हे एकमेव भारतीय पंच ठरले आहेत.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जयदेव म्हमाने यांचा पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन विशेष सत्कार केला. या प्रसंगी काटी गावचे सुपुत्र व पुणे येथील कोथरूड भागातील प्रसिद्ध फळ व भाजीपाला उद्योजक बळी ढगे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांनाही माध्यमांनी पाठबळ द्यावे: मुरलीधर मोहोळ
सत्कार प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, "क्रीडाक्षेत्राला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची आज गरज आहे. ही जबाबदारी केवळ खेळाडूंची नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे. आज जगात क्रिकेटव्यतिरिक्त अनेक ऑलिम्पिक खेळ खेळले जातात, परंतु त्यामध्ये आपण काहीसे मागे पडतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताला अधिकाधिक पदके मिळावीत असे वाटत असेल, तर प्रसारमाध्यमांनी (मीडिया) पुढे येऊन या खेळाडूंना आणि खेळांना योग्य प्रसिद्धी दिली पाहिजे. क्रिकेटच्या गर्दीत इतर खेळांचे महत्त्व अधोरेखित करण्याची भूमिका पत्रकारांनी चोख बजावायला हवी. खेळाडू त्यांचे काम चिकाटीने करतीलच, पण त्यांचे कर्तृत्व जगासमोर आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे."

१० वर्षांनंतर रचला इतिहास; धाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा
जयदेव म्हमाने यांनी २०१३ मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या 'वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स'मध्ये आशिया खंडाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे ते एकमेव भारतीय खेळाडू होते. त्यानंतर २०१७ मध्ये भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने तुर्कमेनिस्तानमधील अश्गाबात येथे झालेल्या 'एशियन इनडोअर व मार्शल आर्ट्स गेम्स'मध्ये ४५ सदस्यांच्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता, जिथे भारताने पारंपरिक कुस्ती आणि बेल्ट रेसलिंगमध्ये चार कांस्यपदके जिंकली होती. आता तब्बल १० वर्षांनंतर थेट पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होणारे ते देशातील एकमेव खेळाडू ठरले आहेत. आजवर भारताच्या इतिहासात अशी दुहेरी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

व्हिएतनाममध्ये ५ जूनपासून थरार
ही आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप व्हिएतनाममधील दा नांग (Da Nang) येथील 'तिएन सोन स्पोर्ट्स सेंटर' येथे ५ ते १० जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. व्हिएतनाम रेसलिंग फेडरेशनतर्फे आयोजित आणि 'युनायटेड वर्ल्ड रेसलिंग' (UWW) व 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया' (OCA) द्वारे मान्यता प्राप्त या स्पर्धेत एकूण १८ क्रीडाप्रकार असणार आहेत. यामध्ये रेसलिंग, पॅनक्रेशन, किकबॉक्सिंग, ज्युडो, तायक्वांडो यांसारख्या थरारक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आणि पंच जयदेव म्हमाने ५ जून रोजी व्हिएतनामसाठी रवाना होणार असून १० जून रोजी भारतात परतणार आहेत.

एका ग्रामीण भागातून जागतिक ऑलिम्पिक मंचापर्यंत मजल मारणाऱ्या जयदेव म्हमाने यांच्या या दैदिप्यमान यशामुळे केवळ धाराशिव जिल्ह्याच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments