Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
केंद्रातील भाजप सरकारने मागील १० ते १२ दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात प्रचंड वाढ केल्यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. या दरवाढीचा थेट फटका खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना बसत असून, या अनिर्बंध महागाईच्या विरोधात आज तुळजापूर तालुका काँग्रेस सेवादल कमिटी (आय) च्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयावर धडक देण्यात आली. सेवादलाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रियांका कारंडे-काळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
'आंदोलनाचा इशारा' आणि शेतकऱ्यांच्या व्यथा
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चालू हंगामात शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता भासत आहे. मात्र, ऐन गर्दीच्या वेळीच शासनाने इंधन महाग केल्यामुळे बाजारपेठेत अन्नधान्य, खाद्यतेल यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने उपाययोजना करून या किमती आटोक्यात न आणल्यास आगामी काही दिवसांत 'तीव्र लोकआंदोलन' छेडण्याचा इशारा काँग्रेस सेवादलाने दिला आहे.
शेतकरी हिताच्या अन्य प्रमुख मागण्या
केवळ इंधन दरवाढच नव्हे, तर ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी निवेदनातून खालील मागण्यांवरही विशेष भर देण्यात आला आहे.
तात्काळ पीक विमा वितरण: ग्रामीण भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मागील हंगामातील प्रलंबित पीक विमा रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी.
सिबील (CIBIL) स्कोअरची अट शिथिल करा: राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करताना 'सिबील स्कोअर' न पाहता शासनाच्या आदेशानुसार तात्काळ कर्ज वितरित करावे.
संपूर्ण कर्जमाफी: अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
सर्वपक्षीय व संघटनात्मक उपस्थिती:
हे निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे, सेवादलाचे आणि विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास शाळू (जिल्हाध्यक्ष, सेवादल काँग्रेस),शिवाजी गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश सेवादल सचिव),तानाजी जाधव (तालुकाध्यक्ष, सेवादल काँग्रेस; मु.पो. देवसिंगा - तु.),सत्तार मुलानी (अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष),रमेश बनसोडे (अं.जा. प्र. तालुकाध्यक्ष), संजय गुंजुटे (जिल्हाउपाध्यक्ष, सेवादल काँग्रेस),ॲड. सय्यद मुशताक (NSUI अध्यक्ष, धाराशिव),फरिद शेख (कार्यकर्ता),नारायण जाधव,इस्माईल हारुण (सरचिटणीस, लोहारा),विकास मोरे,गोविंद डोंगरे (पं. स. सदस्य)रसिक महामूद वाले,रावसाहेब भगवान शेंडे,प्रा. मोहनराव सिद्धराम चमू,बाबासाहेब नामू इंगळे,मोईश सय्यद शेखापूरकर यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नायब तहसीलदार प्रियांका कारंडे-काळे यांनी हे निवेदन स्वीकारून, सदर मागण्या शासनाकडे तात्काळ पाठवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
0 Comments