"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून ग्रामस्थांनी राबवलेला एक आगळावेगळा उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील संत सेवा भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने चक्क ३५ जावायांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांचा 'धोंडीदान' सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमातून ग्रामीण भागातील जिव्हाळा आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे.
अधिक मासात जावयाला मान देण्याची परंपरा जुनी असली, तरी मंगरुळकरांनी ही परंपरा सामूहिक स्वरूपात साजरी करून सामाजिक एकतेचा नवा पायंडा पाडला आहे. ह.भ.प. दगडु रावसाहेब डोंगरे यांच्या संकल्पनेतून, ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
काय आहे 'धोंडीदान'?
अध्यात्मिक महत्त्व असलेल्या अधिक मासात आपल्या मुलीच्या पतीचा (जावायाचा) सन्मान करणे, याला 'धोंडीदान' म्हटले जाते. या धार्मिक विधीद्वारे जावयाला विविध भेटवस्तू देऊन त्याचा यथोचित मानपान केला जातो. मंगरुळच्या कंचेश्वर मंदिर परिसरात ३५ जोडप्यांना निमंत्रित करून हा सोहळा साजरा करण्यात आला.
ग्रामस्थांचा सहभाग अन् स्नेहभोजन
केवळ औपचारिकता न पाळता, या ३५ जावायांच्या मानपानाचा आणि स्नेहभोजनाचा संपूर्ण खर्च येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उचलला. कंचेश्वर मंदिरात पहाटे श्रींची पूजा, त्यानंतर धोंडीदान विधी आणि दुपारच्या वेळी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी मोठा सर्वांमध्ये सोहळ्याचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन
या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध करण्यात आले होते. सर्व जावाई बापूंची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
परंपरेला आधुनिकतेची जोड
या उपक्रमाबाबत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, धावपळीच्या युगात गावकीतील माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. अशा धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात, एकमेकांशी संवाद साधतात, यामुळे गावातील एकोपा वाढण्यास मदत होते. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम खऱ्या अर्थाने गावाला समृद्ध करतात, अशी भावना व्यक्त होत आहे.
0 Comments