"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
दुर्गराज रायगडावर ६ जून रोजी साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्तांचा महासागर लोटणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती आणि महत्त्व पाहता, यंदा धाराशिव जिल्ह्यातून सुमारे पाच हजार शिवभक्त रायगडावर दाखल होणार असल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
तुळजापूर शहारातील हॉटेल अशोका येथे सोमवार दि.१ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत शिवराज्याभिषेक सोहळा समिती आणि स्वराज्य पक्षाच्या वतीने या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यात युद्धकला, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि शाहिरी कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक उपक्रम पार पडणार आहेत. यावर्षी ५ आणि ६ जून रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी युवराज संभाजी छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना शिवराज्याभिषेक सोहळ्यातील मानकरी सतीश खोपडे यांनी सांगितले की, २०१७ पासून तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या पायाशी साडी-चोळी-कवड्याची माळ ठेवून ती रायगडावरील शिरकाई देवीला युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे यांच्या हस्ते अर्पण करण्याचा मान तुळजापुरास मिळाला आहे. यामुळे आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते अधिक दृढ झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सोहळ्याचे नियोजन छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय बारकाईने करण्यात आले असून, कडाक्याच्या उन्हाचा विचार करता गडावर आणि पायथ्याशी शिवभक्तांसाठी पाणी व आरोग्य सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य व मानकरी सतीश खोपडे यांनी दिली.
आई तुळजाभवानी आणि शिवराज्याभिषेक: एक अतुट नाते
रायगडावरील शिरकाई देवीला साडी-चोळी आणि कवड्याची माळ अर्पण करण्याचा मान तुळजापूरला मिळाला आहे. हे साहित्य तुळजाभवानीच्या चरणी ठेवून त्यानंतर ते रायगडावर युवराज संभाजी छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अर्पण केले जाणार आहे. तसेच आई तुळजाभवानीची कवड्याची माळ श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारुढ मुर्तीसमोर युवराज संभाजी महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचेकडे मानकरी सतीश खोपडे यांचेकडून सुपूर्द करण्यात येणार आहे.
यामुळे आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील अतुट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे मत स्वराज्य पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केले.
पाच हजार शिवभक्तांची तयारी
यंदाच्या सोहळ्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून विक्रमी पाच हजार शिवभक्त रायगडावर जाणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि 'शिवराज्य' सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य पक्ष संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी केले.
शिवभक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी समिती सज्ज
यावर्षी सोहळ्यात 'भार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा... स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा,स्वराज्याच्या ऐक्याचा' हे मुख्य आकर्षण असणार आहे. युद्धकला, मर्दानी खेळ, शाहिरी कार्यक्रम, गोंधळ, कीर्तन व भजन यांचा समावेश असणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान कडक ऊन लक्षात घेता गडावर व गडाच्या पायथ्याला पुरेसे पाणी, आरोग्य सुविधा आणि इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शिवभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी समिती सज्ज असल्याचे या पत्रकार परिषदेत जीवन इंगळे व महेश गवळी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महेश गवळी, जीवन इंगळे, सतीश खोपडे,पुजारी नगर फाऊंडेशनचे संस्थापक गणेश पुजारी, सत्यजित साठे, नागेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments