Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरच्या वासंती गायकवाड यांना पुण्यात ‘उत्कृष्ट साने गुरुजी बाल भवन सन्मान पुरस्कार प्रदान’; शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | प्रतिनिधी
ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी देत साने गुरुजींच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा कृतीतून जपणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मैलारपूर मुर्टा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. वासंती उमाजी गायकवाड यांच्या कार्याला राज्यस्तरावर मानाची दाद मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, सर्जनशील आणि विद्यार्थीकेंद्री कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट साने गुरुजी बाल भवन सन्मान पुरस्कार’ त्यांना पुण्यातील भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

राष्ट्र सेवा दल पुनर्गठन दिनाचे औचित्य साधून सिंहगड रोड येथील साने गुरुजी स्मारकात आयोजित दिमाखदार कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय नेते नवनाथ गेंड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

प्रतिकूलतेवर मात करणारे शिक्षक समाजाचे खरे दीपस्तंभ
पुरस्कार वितरणानंतर उपस्थितांना संबोधित करताना आमदार कपिल पाटील यांनी सौ. गायकवाड यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. “साने गुरुजींच्या विचारांची ज्योत आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक आव्हाने असतानाही नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे शिक्षक हे समाजाचे खरे दीपस्तंभ आहेत. सौ. वासंती गायकवाड यांच्यासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे
कार्य  प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघटना कटिबद्ध
शिक्षक संघटनेचे नेते नवनाथ गेंड यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करताना संघटनेची भूमिका स्पष्ट केली. “शिक्षकांचे जीवन अधिक सुरक्षित, समृद्ध आणि सन्माननीय व्हावे यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या ध्येयवादी आणि कल्पक शिक्षकांच्या पाठीशी संघटना नेहमीच खंबीरपणे उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्यभरातून आलेले शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब उबाळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

सौ. वासंती गायकवाड यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय बहुमानामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला असून, जिल्हाभरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांनाही नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments