काटी येथील भवानी ग्रामविकास विद्यालयात सीमेवरील जवानांसाठी स्वहस्ते बनवलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे दाखवताना विद्यार्थी, सोबत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी भवानी ग्रामविकास विद्यालय, काटी येथील विद्यार्थ्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर व आकर्षक राख्या तयार करून सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना पाठवल्या आहेत. यासोबतच स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेल्या राख्या पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राख्यांसोबत जवानांना पाठवले कृतज्ञता पत्र
रक्षाबंधन हा केवळ भावा-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता, अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना या उत्सवात सहभागी करून घेण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करताना रेशमी धागे, टिकल्या व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. केवळ राख्याच नव्हे, तर 'तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत' अशी भावना व्यक्त करणारी शुभेच्छा पत्रेही मुलांनी जवानांसाठी राख्यांसोबत लिहुन पाठवली आहेत.
लोकप्रतिनिधींशी नाळ जोडणारा प्रयत्न
सीमेवरील जवानांसोबतच परिसराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पाठवून आपुलकीची भावना व्यक्त केली. चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्यातील आपुलकीचा धागा अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे.
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पाठबळ
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रप्रेम, कृतज्ञता आणि हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढगे सर आणि उपमुख्याध्यापक कविता गायकवाड मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य आणि आवश्यक ते मार्गदर्शन प्रसाद कोळी सर, सागर तोडकरी सर, दीप्ती जाधव मॅडम, शकुंतला गायकवाड मॅडम, सुरेश साळुंके सर तसेच बनसोडे मावशी यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेतील या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक व शिक्षण वर्गातून विशेष कौतुक होत आहे.
0 Comments