"तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी झालेला अथांग भाविक जनसागर आणि उधळले जाणारे कुंकू-फुले!"
तुळजापूर |Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवारी (२१ ऑक्टोबर) पहाटे श्री क्षेत्र तुळजापूर येथे भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाची मुक्त उधळण करत, संबळाचा निनाद आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषात हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर देवीच्या पारंपरिक ‘श्रमनिद्रेस’ प्रारंभ झाला असून, येत्या २६ ऑक्टोबर रोजी आश्विनी पौर्णिमेला देवीची मूर्ती पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे.
१०८ सुती साड्यांचे संरक्षक कवच
श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चलमूर्ती असल्याने विजयादशमीच्या दिवशी देवी सिंहासनावरून उतरून भाविकांसमवेत सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर येते, अशी प्राचीन परंपरा आहे. या सोहळ्यादरम्यान मूर्तीला कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी मूळ मूर्तीला १०८ सुती साड्यांची पिळे (दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार करण्यात आले होते.
पहाटे पूजा व आरती झाल्यानंतर मूर्ती अहिल्यानगर येथून आलेल्या मानाच्या पालखीत विराजमान करण्यात आली. मंदिराभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर, पिंपळाच्या पारावर पालखी ठेवून महाआरती करण्यात आली. यावेळी देवीला साखरभाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या.
महिषासुर वधानंतर 'श्रमनिद्रा'
धार्मिक परंपरेनुसार, महिषासुर दैत्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धाच्या श्रमांनंतर देवी विश्रांतीसाठी मंचकी निद्रेस जाते, अशी श्रद्धा आहे. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवीची मूर्ती गाभाऱ्यातील मानाच्या तेली लाकडी पलंगावर विराजमान करण्यात आली आहे. सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे आश्विनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही श्रमनिद्रा समाप्त होईल आणि देवी सिंहासनावर विराजमान होईल.
प्रमुख मान्यवर व भाविकांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, विविध मठांचे महंत (तुकोजी बुवा, चिलोजी बुवा, हमरोजी बुवा, वाकोजी बुवा), पुजारी मंडळांचे पदाधिकारी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments