'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीमनगरस्थित नालंदा बौद्ध विहारात सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विशेष प्रबोधनात्मक सोहळ्याचे व पूजा-विधीचे भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानवी मूल्यांची जपणूक, व्यसनमुक्ती आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक बौद्ध पूजा-विधीने झाला. ही पूजा अशोक बनसोडे, सोजराबाई बनसोडे, शेषप्पा बनसोडे व सुमित बनसोडे यांच्या हस्तकमलांनी पार पडली. यावेळी त्रिसरण, पंचशील ग्रहण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची गरज
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनुसया बनसोडे यांनी वर्तमान सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची आणि आदर्शांची कास आपण किती प्रमाणात धरली आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विचारांपासून दूर गेल्यामुळेच आज समाजात विविध प्रश्न निर्माण होत आहेत," असे खंतयुक्त उद्गार त्यांनी काढले.
अंधश्रद्धा व व्यसनांवर प्रहार
कार्यक्रमात बोलताना सुमित बनसोडे यांनी मानवी मूल्यांवर भाष्य केले. "सद्यस्थितीत सर्वच धर्मीयांनी नम्रता, शिक्षण आणि प्रामाणिक कष्टाची कास धरणे काळाची गरज आहे. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि क्रोधावर मात केल्यास आणि विवेकाचे भान ठेवल्यास माणूस खऱ्या अर्थाने 'मानव' बनेल," असे विचार त्यांनी मांडले.
यावेळी नंदू बनसोडे यांनी ‘अंधश्रद्धेला टाळा व व्यसनाला जाळा’ या विषयावर आधारित प्रबोधनपर गीत सादर करून उपस्थितांची मन जिंकली. त्यांच्या या गीताने उपस्थितांमध्ये वैचारिक चेतना निर्माण केली.
वैज्ञानिक अधिकारी सुमित बनसोडे यांचा विशेष नागरी सत्कार
या सोहळ्याचे औचित्य साधून गावातील भूमिपुत्र सुमित शेषप्पा बनसोडे यांची ‘वैज्ञानिक अधिकारी’ (Scientific Officer) पदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ सायन्स इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी’ (M.Sc. MIT) ही उच्च पदवी यशस्वीरीत्या संपादन केल्याबद्दल त्यांचा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले हे यश काटी परिसरातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकीतून पुस्तके व मिठाईचे वाटप
केवळ औपचारिकता न ठरवता या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत नशामुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या घडीपत्रिका तसेच 'बौद्ध पूजा पाठ्यपुस्तक' उपस्थितांना मोफत वितरित करण्यात आले. सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन नंदू बनसोडे यांनी केले. या सोहळ्यास काटी व परिसरातील महिला, पुरुष, तरुण आणि बाल-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments