काटी/उमाजी गायकवाड
कर्नाटक राज्याच्या सिमेलगत लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात अनेक वर्षांपासून वेळ अमावस्या सण साजरा करण्याची परंपरा असून त्याच रुढी परंपरेनुसार तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरातील सावरगाव, केमवाडी, वडगाव ( काटी) , गंजेवाडी, दहिवडी, सुरतगाव तामलवाडी,पिंपळा,माळुंब्रा,सांगवी(काटी), मसला (खुर्द),मंगरुळ,कुंभारी,खुंटेवाडी आदी परिसरातील गावांत सोमवार दि. 30 रोजी दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी ग्रामीण भागात येऊन येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे रविवारी दिवसभर काटीसह परिसरातील गावांमध्ये शुकशुकाट दिसून आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून वनभोजनाचा सर्वानी आनंद लुटला.
शेकडो वर्षाची परंपरा असणारा वनभोजनाचा स्वाद देणारा हा कृषीप्रधान संस्कृतीचा एक महत्त्वाचा व ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक समजला जाणारा
दर्शवेळा अमावस्या (येळवस) सण खवय्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. या दिवशी जेवणाचा मेनू म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंदच. शेतकऱ्यांकडून या सणाची तयारी आठवडाभरापासून केली जाते. या दिवशीचा एक-एक पदार्थ म्हणजे भन्नाट आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या कडून उकडून केलेली भज्जी आफलातून असते.
तुरीच्या शेंगा शेंगा चवळी, भुईमूग, घेवडा, मेथी, लसूण पात, कांदापात, करडी पात यासह सर्व रानमेवा त्यासाठी जमा केला जातो. जेवणातील दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आंबिल. ज्वारीच्या पीठात बनवले आंबिल पिऊन झाडाच्या सावलीत घेतलेली एक डुलकी म्हणजे एक प्रकारे स्वर्गसुखच असते. ज्वारीच्या पेंढीची कोप करुन त्यावर पांघरूण घालून त्यामध्ये पुजा मांडली जाते. पुजेनंतर सर्वांना जेवण दिले जाते.
ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. घराच्या शेजारी, शेतशिवार शेजारी, मित्र परिवार व नातेवाईकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. आज सोमवार जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केल्याने सकाळपासून शहरांतून गावाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर गर्दी दिसत होती. परिणामी काटीसह परिसरातील सर्व गावात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्यासारखेच दिसून आले.
शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा व काळ्या आईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, अंबिल, बाजरीचे उंडे, खीर,धपाटे, तिळाची पोळी आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेतला.ज्यांना शेती नाही अशांनी नातेवाईक, मित्रमंडळीच्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला. सायंकाळी उत्तरपुजा करून वेळ अमावस्याची सणाची सांगता करण्यात आली.
0 Comments